devendra fadnavis reaction : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या सलग तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन करतानाच त्यांनी विरोधकांवर खोट्या प्रचाराचा आरोपही केला आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुन्हा एकदा देशातील जनतेनं एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केलं आणि नरेंद्र मोदीजी हे सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. त्याबद्दल फडणवीस यांनी सर्वप्रथम मोदी यांच्यासह देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले. त्याबद्दल फडणवीसांनी त्यांचेही आभार मानले आहेत.
देशातील जनतेनं भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे. इंडि (India Alliance) आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडी आहे, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं आहे, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगलं यश मिळेल, असं वाटत होतं. तसं झालं असतं तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढं गेली असती. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचं दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचं सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९४ जागा मिळाल्या आहेत. ४०० पार नारा देणारा भाजप ३०० पार करून शकला नाही. त्या तुलनेत इंडिया आघाडीनं घवघवीत यश मिळवलं आहे. या आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. तर, १७ जागांवर इतरांनी विजय मिळवला आहे. महाराष्ट्रात भाजप व मित्रपक्षांचं मोठं नुकसान झालं आहे. २०१९ च्या निवडणुकीत अखंड शिवसेनेसोबत लढणाऱ्या भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता अवघ्या १० जागा मिळाल्या आहेत.