महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी दौरे काढत जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. शहांच्या दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर बाजारबुणगे म्हणत जोरदार टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अमित शहांना आपण दररोज नमस्कार केला पाहिजे, असेही ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, परमेश्वरावर, महापुरुषावर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊतच करू शकतात. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यामुळे अमित शहा यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. असं काम करणाऱ्यांना टोकणं हे संजय राऊतच करू शकतात.कोल्हापुरातील खानापूर येथे ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०२४ ला तिन्ही पक्षांच्या मिळून १७० च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अन्य अनेक चांगल्या योजना या सरकारने जनतेसाठी आणल्या आहेत. या योजना आणूनही मनात उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखी महाराष्ट्राची जनता नाही.
मात्र अशीच उपकाराची भावना काहींनी ठेवली असती तर २०१९ लाच युतीचे सरकार आलं असतं. आता त्यांचं जे नुकसान झालं ते झालं नसतं, असा खोचक टोला वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, अमित शाह दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते २०१९ बाबत बोलले असतील असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अमित शहा म्हणाले होते की, २०२४ मध्ये महायुतीचं सरकार येणार आहे, तर २०१९ मध्ये भाजपचे स्वबळाचे सरकार आणायचं आहे.
दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांनी मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र भुयार हे माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले आहेत माहित नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल, तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन. दिसायली एक नंबरची मुलगी नोकरीवाल्यांना मिळते, दोन नंबर असणारी मुलगी पानटपरी किंवा किराणा दुकानदारांना मिळते, तर दिसायला तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते, असा विधान अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं होता. यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी महिला उपभोगाचं साधन आहे का? असा सवाल करत भुयार यांच्यांवर टीका केली आहे.