मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ashish shelar news : भाजप नेत्याचं सलमान खान याच्या कुटुंबीयांसोबत स्नेहभोजन; ट्वीट करून म्हणाले…

ashish shelar news : भाजप नेत्याचं सलमान खान याच्या कुटुंबीयांसोबत स्नेहभोजन; ट्वीट करून म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 08, 2024 03:10 PM IST

Ashish Shelar meets Salman Khan Family : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नुकतीच सलमान खान, सलीम खान व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शेलार यांनी खान कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनही केलं.

आशिष शेलारांनी घेतली सलमानच्या कुटुंबीयांची भेट; ट्वीट करून म्हणाले…
आशिष शेलारांनी घेतली सलमानच्या कुटुंबीयांची भेट; ट्वीट करून म्हणाले…

Ashish Shelar meets Salman Khan Family : मुंबई भाजपचे अध्यक्ष व वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच अभिनेता सलमान खान, पटकथाकार-लेखक सलीम खान यांची भेट घेतली. शेलार यांनी खान कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनही घेतलं. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आशिष शेलार यांनी स्वत: ‘एक्स’ वर फोटो पोस्ट करून या भेटीची आणि स्नेहभोजनाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे. दिवसागणिक प्रचाराचा जोर वाढत आहे. मुंबई देखील यास अपवाद नाही. मुंबईत बहुतेक पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. तर, काही मतदारसंघात अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो, त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.

उत्तर मध्य मुंबई लोकसभेचं प्रतिनिधित्व सध्या भाजपच्या पूनम महाजन करत आहेत. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन वेळा त्या निवडून आल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी त्यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं बोललं जातं. त्यामुळं शेलार यांच्या या भेटीची चर्चा आहे.

सेलिब्रिटी उमेदवाराची चाचपणी

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून एखादा लोकप्रिय चेहरा उतरवण्याचा विचारही भाजपमध्ये सुरू असल्याचं कळतं. त्याची चाचपणीही सुरू आहे. देशभरात भाजपनं अनेक कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा धडाका लावला आहे. अलीकडंच अभिनेता गोविंदा यानं भाजपसोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळं भाजपही मुंबईतून एखादा बॉलिवूडचा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो, अशीही अटकळ बांधली जात आहे.

उत्तर मध्य मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात सिनेमा उद्योगातील मोठमोठ्या कलाकारांचं वास्तव्य आहे. त्यात सलमान, शाहरुख हे स्टारही आहेत. त्यापैकी सलमान खान याची भेट शेलार यांनी घेतली आहे. सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांचं राजकीय नेत्यांशी नेहमीच सलोख्याचं नातं राहिलं आहे. ठाकरे कुटुंबीयांशीही त्यांचा स्नेह आहे. मात्र, अलीकडं भाजपनं कलाकारांशी संपर्क वाढवला आहे. शेलार-सलमान भेटीकडं याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे.

आशिष शेलार यांच्या सोशल पोस्टमध्ये काय?

सलीम खान, हेलनजी आणि सलमानच्या भेटीमुळं आनंद झाला. त्यांच्या कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतलं. आरोग्याच्या क्षेत्रात व गोरगरिबांसाठी सलीम खान गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या कार्याची माहिती घेतली व त्यांच्याशी चर्चा केली, असं शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

IPL_Entry_Point