Ashish Shelar Threat : मुंबईच्या चौपाटीवर हातपाय तोडून संपवतो; आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
Ashish Shelar Death Threat : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे.
BJP leader Ashish Shelar Death Threat : प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेलार यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या चौपाटीवर हातपाय तोडून कुटुंबासह संपवणार असल्याची धमकी अज्ञात आरोपीनं पत्राद्वारे दिली आहे. वांद्रे येथील टपालात आशिष शेलार यांच्या नावे मिळालेल्या पत्रामुळं मुंबईत खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते आशिष शेलार यांना एका निवानी पत्राद्वारे अज्ञात आरोपीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर शेलार यांनी स्वत: वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेलार यांना नेमकी कुणी धमकी दिलीय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेलार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षी देखील जानेवारी महिन्यातच आशिष शेलार यांना अज्ञात आरोपीनं फोन करून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता यावर्षी जानेवारी महिन्यातही आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळं आता शेलार यांना धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीचा मुंबईतील वांद्रे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.