भाजपा एक विषारी साप… त्याला दूर ठेवा: कॉंग्रेस नेत्याचं आवाहन-bjp is like poisonous snake keep it aways mallikarjun kharge to congress workers ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपा एक विषारी साप… त्याला दूर ठेवा: कॉंग्रेस नेत्याचं आवाहन

भाजपा एक विषारी साप… त्याला दूर ठेवा: कॉंग्रेस नेत्याचं आवाहन

Aug 21, 2024 06:30 PM IST

नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रित करु पहात आहेत अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (PTI)

नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रित करु पहात आहेत. भारतीय जनता पक्ष हा एक साप आहे, त्याच्यापासून लांब रहा, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित सदभावना दिवस मेळाव्यात खर्गे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

खर्गे पुढे म्हणाले, 'भाजपने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारे तोडफोड करून घालवली व भाजपाची सत्ता आणली. मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले व फुटीरांना राज्यसभा बहाल केल्या. पण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चोख उत्तर दिले. जनतेने भाजपला २४० वरच रोखले. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढा व मविआचे सरकार आणा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजीव गांधी पंतप्रधान असताना विविध लसीकरण केले पण कधीच त्यांचा फोटो लावला नाही. पण मोदींनी कोरोना लसीच्या पत्रकावर फोटो लावण्याचे चिल्लर काम केले, अशी टीरा खर्गे यांनी केली. 

काँग्रेस सत्तेत असताना शिवसेना नेत्यांच्या घरी कधी ED, CBI आली नाही: उद्धव ठाकरे

काँग्रेस पक्ष सत्तेत असताना शिवसेनेशी कधीच सूडभावनेने वागला नाही. पण भाजपा मात्र शिवसेनेला संपवायला निघाला आहे. काँग्रेसची सत्ता असताना शिवसेना नेत्यांच्या घरी कधीच ईडी, सीबीआय आली नाही, असं मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'माजी पंतप्रधान राजीव गांधी हे सभ्य व सुसंस्कृत व्यक्ती होते. राजीव गांधी यांनी कोणताही नारा न देता ४०० पार केले होते. एवढे बहुमत असतानाही राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून देशात पंचायत राज शासन व्यवस्था आणली. १९९४ साली भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना, काँग्रेस पक्षाने आंदोलने केली तर त्यांच्यावर लाठी उगारायची नाही, असे स्पष्ट बजावले होते, अशी आठवण सांगितली. काँग्रेस पक्ष जास्त दिवस सत्तेत होता. पण शिवसेनेशी कधीच सूडभावनेने वागला नाही, असं ठाकरे म्हणाले. राजीव गांधी शिवसेनेशी कधीच सुडभावनेने वागले नाहीत. पण भाजपा मात्र शिवसेनेला संपवायला निघाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आता भाजपाचा सुपडासाफ करायचा आहे. एकजूट व वज्रमुठ करून देशावरचे संकट दूर करू असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले.