मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत मोठा निर्णय! विधानसभेसाठी भाजपचा रोडमॅप तयार

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत मोठा निर्णय! विधानसभेसाठी भाजपचा रोडमॅप तयार

Jun 18, 2024 11:19 PM IST

Bjp Core Committee Meeting : देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील भाजपमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत मोठा निर्णय! 
देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत मोठा निर्णय! 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला, यानंतर  देवेंद्र फडणवीस  यांनी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षसंघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची नवी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीसांच्या इच्छेनुसार उपमुख्यमंत्री पदापासून त्यांची मुक्तता आणि भाजपच्या राज्यातील नेतृत्वाचा फैसला होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या बैठकीनंतर महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नसल्याचे,  तसेच फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर कायम राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील कोअर कमिटीच्या या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, पियुष गोयल आदि नेते उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला व बैठकीतील चर्चेची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या लोकसभा निकालावर या बैठकीत सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रात फक्त ०.३ टक्क्यांचा फरक महायुती आणि महाविकासआघाडीच्या मतांमध्ये आहे. कुठे मतं मिळाली? कुठे मिळाली नाहीत. कुठे अडचणी आल्या,काय उपाय केले पाहिजेत, यावर यावर चर्चा झाली. विधानसभेच्या ब्लू प्रिंटवर या बैठकीत चर्चा केली गेली. भाजपची केंद्रीय कार्यकारिणी पूर्ण ताकदीने आमच्या मागे आहे, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या आमच्या रणनीतीवर चर्चा केली. यानुसार आम्ही एनडीएतील घटक पक्षांसोबत विधानसभेच्या चर्चा करू आणि भाजप विधानसभेला पूर्ण ताकदीने उतरेल. विधानसभा निवडणूक आम्ही महायुतीतील घटक पक्षांसोबत लढणार आहोत. यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. घटक पक्षांना सोबत घेऊन आगामी विधानसभा कशी लढता, येईल यावर बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, लोकसभा निकाल लागल्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांशी चर्चा केली होती. त्यांना थोडं थांबण्याचा सल्ला शहा यांनी दिला होता. त्यानंतर आजच्या बैठकीत यावरचर्चा होण्याची शक्यता होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील भाजपमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर