मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: 'शिवसेनेतील बंडामागे भाजप; आमदारांची सुटका करावीच लागेल'
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
24 June 2022, 16:38 ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 16:38 IST
  • BJP Behind Shiv Sena Revolt: शिवसेनेतील बंडामागे भारतीय जनता पक्षच आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केला.

Uddhav Thackeray Targets BJP: एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळं शिवसेनेसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. या सगळ्यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेत जोरदार बंडाळी माजली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुतेक आमदार पक्षाला सोडून गेले आहेत. काही खासदारांनीही शिंदे यांच्या बंडाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यामुळं संघटना एकसंध ठेवण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी त्यांनी बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसंच, या सगळ्या बंडाचा सूत्रधार भाजप असल्याचा आरोप केला.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना सुरतच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले, तेव्हाच यामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं होतं. भाजपचे मोहित कंबोज, संजय कुटे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठीही गेले होते. आमदारांची ठेवण्यात आलेली बडदास्त, त्यांना देण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त, भाजपशासित आसाममध्ये हलवण्यासाठी सज्ज असलेली विमानं हा सगळा त्याचा पुरावा होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत होते. काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच यामागे असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं.

‘या सगळ्यामागे भाजपच आहे. आता पदाधिकाऱ्यांना फोन यायला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच हे बंड करायला सांगितलंय, असं पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. हा भाजपचा डाव आहे. आजवर भाजपसोबत गेलेले सर्व संपले आहेत. आपल्या आमदारांचीही आग्र्याहून सुटका करावीच लागेल, असं उद्धव म्हणाले. 'बंड झाल्यानंतरही शिवसेना याआधी दोन वेळा सत्तेत आली आहे. कितीही आमदार घेऊन जा, शिवसेनेला काहीही होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहनही उद्धव यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केलं.