मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Graduate Election : सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा; राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

Nashik Graduate Election : सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा; राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 03:43 PM IST

Nashik Graduate Election : नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात भाजपच्या आमदारांनी भाग घेतला होता. त्यानंतर आता निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालं आहे.

Satyajeet Tambe Nashik
Satyajeet Tambe Nashik (HT)

Satyajeet Tambe Nashik : काँग्रेसविरोधात बंडखोरी करत नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना अखेर भाजपनं अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसमधील निलंबित नेते सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज भरला नव्हता. तर दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांना धोबीपछाड दिला होता. त्यानंतर आता भाजपनं सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर नाशिक पदवीधर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपकडून सत्यजीत तांबे तर महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील रिंगणात आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपनं सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा भाजपा नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले की, भाजपाच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला असून तरुण आणि होतकरू असलेल्या सत्यजीत तांबे यांना साथ देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी नाशिकमध्ये दाखल होत अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याशिवाय भाजपचे आमदार अमरिष पटेल यांनी सत्यजीत तांबे यांच्या प्रचारार्थ शिरपूरमध्ये पदवीधरांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर आता भाजपनं अधिकृतरित्या काँग्रेसविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिल्यामुळं नाशिक पदवीधर निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

IPL_Entry_Point