मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll Election : चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Pune Bypoll Election : चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 09, 2023 11:58 PM IST

Kasba Peth And Chinchwad By Election : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डच्चू देण्यात आला आहे.

Kasba Peth And Chinchwad Assembly By Election
Kasba Peth And Chinchwad Assembly By Election (HT)

Kasba Peth And Chinchwad Assembly By Election : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून आश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या शीर्ष नेत्यांनी दोन्ही पोटनिवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपनं जारी केलेल्या यादीत केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, आणि पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, माजी मंत्री आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कसबा पोटनिवडणुकीचे प्रभारी आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार गिरीश बापट, खासदार धनंजय महाडिक, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, हरयाणाचे प्रभारी विनोद तावडे, आमदार श्रीकांत भारतीय आणि सुनील कर्जतकर या नेत्यांचा भाजपनं पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिलं आहे.

पोटनिवडणुकीत विजयासाठी मविआकडूनही मोर्चेबांधणी...

पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसनं उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि नाना पटोले यांना उतरवलं आहे. याशिवाय कसब्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या विजयासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनिल शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळं आता या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

WhatsApp channel