मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ व्या वर्धापन दिन सोहळा शनिवारी नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सर्वच पक्षांचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरेंनी शरद पवारांसह महायुती आणि महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल चढवला. पक्षांतर किंवा फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना, मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेण्याचे प्रकार सुरू आहेत तसे मला करायचं नाही. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देशाच्या भल्यासाठी एकच काय, १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी राष्ट्र सर्वोतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला मुलं आमची, तुमची यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. देशहितासाठी आणखी १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी चांगली पोरं भाजपा घेईल. आमचं केंद्रीय नेतृत्त्व असणारे नरेंद्र मोदी यांना कोणाला कडेवर घ्यायचं, कोणाला गोंजारायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या १८ वर्षात खूप चढउतारात पाहिले. आपण माझ्यासोबत आहात हे समाधान आहे. यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय. पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.
तसेच राष्ट्रवादी फुटीवरराज्यातील जनतेला फक्त वेडं बनवण्याचं काम केलं जात असल्याचं राज ठकारे म्हणाले होते. सर्वजण आतून एकच आहेत. राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. हा आमचा ठाम निर्णय असून त्यातून आता माघार नाही असं तटकरे म्हणालेत. तसेच शिवसेनेतून फुटून तुम्ही मनसे पक्ष काढला. ठाकरे बंधू अजूनही एकत्र आहेत, असं आम्ही म्हटले तर चालेल का? मनसे काढली त्यानंतर आता प्रदीर्घ कालावधीनंतर ठाकरे एकत्र आहेत असं आम्ही म्हटलं तर कसं वाटेल, यांचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं,असंही तटकरे म्हणालेत.