Vaidyanath Karkhana Election : वैद्यनाथ साखर कारखान्यात मुंडे बहीण-भाऊ एकत्र; परळीत भाजप अन् राष्ट्रवादीचा नवा पॅटर्न
Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने युती करत राज्यात नवा पॅटर्न आणला आहे.
Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana Election 2023 : परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीने युती केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एकत्र येत वैद्यनाथ कारखान्यात बिनविरोध निवडणुका पार पाडल्या आहे. त्यानंतर वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडेचे विश्वासू चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता परळीत मुंडे बंधूभगिनींच्या नव्या राजकीय समीकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १० आणि भाजपाचे ११ उमेदवार विजयी झाले होते. दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात सत्तेसाठी वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांनी युती करत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात सत्ता स्थापन केली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची धुरा पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाची वर्णी लागली आहे. त्यामुळं आता या निवडणुकीला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठं राजकीय महत्त्व आलं आहे.
परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या हातात कारखान्याची सूत्रं आली होती. परंतु २०१९ साली परळीतून विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर कारखान्यातील समीकरणं बदलली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत कारखान्यात सत्ता स्थापन केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.