Wardha News: वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी सुधीर खरकाटे यांच्यावर वर्धा शहरातील एका मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित रुचिका ठाकरे हिने रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वर्धा येथील एका सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली आहे. सुधीर खरकाटे याने मुलीबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थी आणि वर्धा येथील स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सुधीर खरकाटे यांना तात्काळ निलंबित करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे.
रुचिकाचा दावा आहे की, १७ जानेवारी रोजी एका कारने मुद्दाम तिच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे ती बाईकसह खाली पडली. रुचिकाच्या मदतीला आलेले लोक येत असताना कारचालकाने गाडीवर काही स्क्रॅच आहेत की नाही? याची तपासणी सुरू केली. रुचिकाने त्या व्यक्तीशी सामना केला आणि त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. तिने घरी फोन केला. यावेळी ड्रायव्हरची पत्नी कारमधून खाली उतरली आणि रुचिकाशी संवाद साधू लागली. त्यानंतर वाद पेटल्याने ड्रायव्हरने तिच्या कानशिलात लगावून मारहाण करण्यात सुरुवात केली. यात रुचिका जमीनीवर कोसळली. स्थानिक लोकांनी मध्यस्ती करून वाद मिटवला. त्यानंतर कार ड्रायव्हरने तिच्या पायावरून कार चढवली आणि घटनास्थळावरून पळून गेला.
रुचिकाची आई आणि भाऊ आले, तेव्हा उपस्थितांनी त्यांना कारच्या ड्रायव्हरची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार तो जवळच भाड्याच्या घरात राहतो. रुचिका आणि तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिस ठाण्यात दिली. एका नातेवाईकाने पोलिस ठाणे गाठून रुचिका आणि तिच्या कुटुंबांना गुन्हा मागे घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला.
ही संपर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाख लोकांनी पाहिले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सुधीर खरकाटे आणि त्याची पत्नी रुचिकाला आक्षेपार्ह भाषा वापरून तिला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. रुचिकाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलनुसार, ती बाईकर आणि फिटनेस प्रेमी असल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या