संतोष देशमुख प्रकरण भोवलं; पंकजा-धनंजय मुंडेंचा पत्ता कट, फडणवीस-अजित पवार बैठकीत बीडचा पालकमंत्री ठरला!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतोष देशमुख प्रकरण भोवलं; पंकजा-धनंजय मुंडेंचा पत्ता कट, फडणवीस-अजित पवार बैठकीत बीडचा पालकमंत्री ठरला!

संतोष देशमुख प्रकरण भोवलं; पंकजा-धनंजय मुंडेंचा पत्ता कट, फडणवीस-अजित पवार बैठकीत बीडचा पालकमंत्री ठरला!

Jan 03, 2025 03:48 PM IST

Beed Guardian Minister : पालकमंत्री ठरला असून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. ⁠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

बीडचा पालकमंत्री ठरला!
बीडचा पालकमंत्री ठरला!

बीज जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मुंडे बहीण भावाला चागलंच भोवण्याची चिन्हे आहेत. देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला अटक केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच बीडमध्ये फोफावलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावं, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी धक्कातंत्र वापरत बीडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडचा पालकमंत्री ठरला असून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे.⁠ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.

वाल्मीक कराड प्रकरणावरून मुंडे कुटूंब गोत्यात आले असून बीडच्या पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला असून पंकजा मुंडे यांनादेखील संधी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात येत होती. मात्र देवेंद्र फडणवीस व अजित पवारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर बीडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच देण्यात येणार असल्याचे समोर आले असून अजित पवार स्वत: बीडचे पालकमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात होते. वाल्मीकवर खंडणीचे अनेक गुन्हेही नोंद आहेत. देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक जवळपास२२दिवस फरार होता. अखेर त्याने खंडणीच्या गुन्ह्यात त्याने पुण्यात सीआयडी पथकासमोर शरणागती पत्करली. या काळात त्याने धार्मिक पर्यटन केल्याचे बोलले जात आहे.

पालकमंत्र्यांचा निर्णय येत्या दोन दिवसात -

मंत्रिमंडळ विस्तार होऊनदोन आठवडे उलटल्यानंतरही राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. सत्ताधारी महायुतीत तीन पक्ष असल्याने कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायचं, याबाबत बैठकी सुरू असून अनेक जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असल्याचे वृत्त आहे. यामुळे पालकमंत्रीपदाची घोषणा लांबणीवर पडली आहे. मात्र येत्या एक दोन दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर