Ladki Bahin Yojana scam news : महायुतीला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. मात्र, या योजनेचे अनेक घोटाळे आता पुढे येऊ लागले आहेत. अनेकांनी बोगस लाभार्थी होत या योजनेचा फायदा घेतला आहे. धक्कादायक म्हणजे, गावात मुस्लिम महिला नसतांना त्यांच्या नावाने काही परराज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या रॅकेटने लातूर, सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं खोटं दाखवून परराज्यात राहणाऱ्या महिलांना राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ करून दिला आहे. त्यांनी तब्बल १,१७१ अर्ज भरले असून हे सर्व या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र या प्रकरणी तपास केल्यावर या महिला या उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल व राजस्थानातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या बार्शी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बार्शी तालुक्यात २२ बोगस अर्ज आढळून आले असून त्यांचा लाभ आता रोखण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील एका गावात या योजनेचा काही जणांनी बोगस लाभ घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता बार्शी तालुक्यातील एका गावात मुस्लिम महिलांचे अर्ज आलेले दिसले. तपास पथकाने याची पडताळणी केली असता, गावात एक देखील मुस्लिम कुटुंब नसल्याचं तपासात पुढं आलं. यानंतर त्यांच्या आधारकार्ड क्रमांक, बँक खात्याच्या तपशील तपासण्यात आला. यात या महिला उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल व राजस्थानातील असल्याचं समोर आलं.
या महिलांनी बनावट लॉगिन आयडीच्या माध्यमातून गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेतला असल्याचं पुढं आलं आहे. सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा या योजनेत देण्यात आली होती. भामट्यांनी याचा फायदा घेत एका लॉगईन आयडीवर अनेक अर्ज भरून हा घोटाळा केला. यात अंगणवाडी सेविका मुनमुन ठाकरे व अंगणवाडी सेविका अनवरा बेगम (रा. बोरगाव बु., जि. लातूर) या दोघींच्या बनावट आयडीद्वारे १७१७ बोगस अर्ज भरत त्यांनी सरकारचे पैसे लाटले. या प्रकरणाची चौकशी केल्यावर या बोगस अंगणवाडी सेविका असल्याचं उघड झालं आहे.
आरोपींनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करत नकली आधार क्रमांकावरून अस्पष्ट प्रती अपलोड केल्या,. त्यामुळे पडताळणी करतांना त्यांची माहिती स्पष्ट होत नव्हती. याचाच फायदा घेऊन आरोपींनी बोगस लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिस या घोटाळ्याचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या