Ajit Pawar News : भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागानं २०२१ मध्ये जप्त केलेली त्यांची १ हजार कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता मुक्त केली आहे. बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणानं अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांवरील आरोप फेटाळल्यानंतर इन्कम टॅक्सनं हा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला.
आयटी विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी बेनामी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात साताऱ्यातील साखर कारखाना, दिल्लीतील फ्लॅट आणि गोव्यातील रिसॉर्टसह अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांच्या नावावर कोणत्याही मालमत्तेची नोंद नसल्याचं तपासात समोर आलं आहे.
न्यायाधिकरणानं पुरेशा पुराव्याअभावी अजित पवार यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. कायदेशीर मार्गाचा वापर करूनच मालमत्तांचे आर्थिक व्यवहार झाले असून बेनामी मालमत्तांशी अजित पवार कुटुंबीयांचा कोणताही संबंध असल्याचं समोर आलेलं नाही, असं लवादानं म्हटलं आहे.
'अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबाने बेनामी मालमत्ता घेण्यासाठी निधी हस्तांतरित केल्याचा कोणताही पुरावा नाही. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केला नाही,' असं न्यायाधिकरणानं म्हटलं आहे.
अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांची बाजू मांडणारे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, या आरोपांना कोणताही कायदेशीर आधार नाही. पवार कुटुंबानं काहीही चुकीचं केलेलं नाही. या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बँकिंग व्यवस्थेसह कायदेशीर माध्यमांतून झाले होते. रेकॉर्डमध्ये कोणतीही अनियमितता नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.
अजित पवार यांच्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र, कालांतरानं याच अजित पवार यांना भाजपनं आपल्यासोबत घेतलं. इतकंच नव्हे, त्यांना सरकारमध्ये अर्थमंत्रीपद म्हणजे एक प्रकारे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. त्यानंतर आता इन्कम टॅक्सनं त्यांच्या जप्त मालमत्ताही मुक्त केल्या आहेत. त्यामुळं विरोधकांनी महायुती सरकारवर विशेषत: भाजपवर टिकेची झोड उठवली आहे.
संबंधित बातम्या