
Raj Uddhav Alliance : फोडाफोडी, पळवापळवी आणि बंडखोरीमुळं राज्याचं राजकारण ढवळून निघालं असतानाच आता या राजकारणात नवा ट्वीस्ट आला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. त्यामुळं राज व उद्धव पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मनसेच्या नेत्यानं लगेचच यावर खुलासा केला आहे.
नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून आणि महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष झाल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत. त्यातच भाजपनं प्रादेशिक पक्षांना नामोहरम करण्याची रणनीती स्वीकारल्यानं हे पक्षही अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना फोडल्यानंतर भाजपनं आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही गळाला लावलं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला थेट सत्तेत सहभागी होण्यास भाग पाडलं आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर मुंबईत झळकले होते. तेव्हापासून पुन्हा एकदा एकत्रीकरणाच्या चर्चेला तोंड फुटलं होतं. यावर कोणत्याही मोठ्या नेत्यानं अधिकृत काहीही भाष्य केलं नव्हतं. मात्र, आता मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेकडं मैत्रीचा हात पुढं केल्याचं बोललं जात होतं.
मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या कार्यालयात आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. अभिजित पानसे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. 'मी संजय राऊत यांना भेटलो हे खरं आहे. मात्र, ही भेट माझ्या वैयक्तिक कामासाठी होती. त्याचा मनसे व शिवसेनेच्या युतीशी संबंध नव्हता. मी एवढा मोठा नेता नाही. असं काही असेल तर स्वत: राज ठाकरे व उद्धव ठाकरे करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असतानाच राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. तेव्हापासून शिवसेनेची स्पर्धक म्हणून मनसे राजकारण करत आहे. त्यातून मराठी माणसाचं नुकसान होत असल्याचं लोकांना वाटतं. त्यामुळं राज व उद्धव यांनी एकत्र यावं अशी शिवसैनिकांची भावना आहे. तशी मागणी अधूनमधून होत असते. आता बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा या मागणीनं जोर धरला आहे.
संबंधित बातम्या
