Sanjay Raut Reaction On Vinod Tawde: महाराष्ट्रात आता निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक असताना मोठी घटना घडली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटत असल्याची माहिती त्यांच्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी दिल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्यात भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे अडकले असून, त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांनी या प्रकरणी मोठा दावा केला आहे. भाजपाकडून पैसे वाटप होत असताना त्यांनी स्वतः हॉटेलमध्ये जाऊन या पैसे वाटणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना रंगेहाथ पकडल्याचे म्हटले आहे. क्षितिज ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, भाजपाचे काही कार्यकर्ते आणि नेते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते, आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान आता या प्रकारणावर संजय राऊत यांनी देखील खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!’ यानंतर त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.
भाजप नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ‘जे काही घडलं आहे ते आता सगळ्यांच्या समोरच आहे, यावर खुलासे कसले देताय. विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. पक्षाच्या महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. बहुजन विकास आघाडीचे लोक त्या हॉटेलमध्ये शिरले आणि त्या लोकांनी हे पैसे जप्त केले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धाड घातली, हे पैसे जप्त केले आणि हॉटेलमध्ये गोंधळ घातला. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांना हॉटेलमध्येच कोंडून ठेवले. आता यावर भारतीय जनता पक्ष काय खुलासा करणार?’
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत जवळपास प्रत्येक मतदारसंघात आचारसंहितेच्या आधी १५ ते २० कोटी रुपयांचे वाटप केलं गेल्याचे समोर आले आहे. अजूनही पैसे वाटप सुरूच आहे. आजच नाशिकच्या एका हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांचे पैसे जप्त करण्यात आले आहेत. मुंबईच्या ठाण्यामध्ये खास पैसे वाटप करण्यासाठी लोकांच्या नेमणूक या करण्यात आल्या आहेत. ठाण्याच्या बाजूलाच ईशान्य मुंबई आहे, तिथेच राम रेपाळे नावाचा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती शिंदे गटाचा असून, दररोज रात्री११नंतर पैसे घेऊन येतो आणि त्या भागातील लोकांना वाटतो. इतकंच नाही तर, पोलीस बंदोबस्तातच पुन्हा ठाण्यात परत जातो. २३ तारखेनंतर या राम रेपाळेचं काय करायचं ते मी बघणारच आहे. माझ्याकडे अशा पैसे वाटप करणाऱ्या १८ लोकांची नावे आहेत. पण, विनोद तावडे स्वतः पैसे वाटतात हे मोठे आश्चर्य आहे.’
‘आमचे कागद तपासतात. आमचे खिसे तपासतात. तिथे भारतीय जनता पक्षाचे नेतेच पैसे वाटतात आणि अशा नेत्यांना पकडून देण्यासाठी त्यांच्याच पक्षांचे बडे नेते माहिती देतात, हे त्यांचेच कारस्थान आहे. कारण काही असेल पण भारतीय जनता पक्षाकडे किती पैसा आहे, ते यानिमित्ताने समोर आले आहे. भारतीय जनता पक्षातील बहुजनांचे नेतृत्व असणारे विनोद तावडे पुढच्या निवडणुकीत समोर उभे राहू नयेत, यासाठी हा सगळा खेळ झाला असावा असं मला वाटत आहे. विनोद तावडे यांच्याकडे एकूण१५कोटी रुपये होते, अशी माहिती मला मिळाली आहे. त्यापैकी केवळ पाच कोटी रुपये क्षितिज ठाकूर यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जप्त केले आहेत’, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.