bharat jodo nyay yatra in Nashik : भारत जोडो न्याय यात्रा ही नंदुरबार आणि मालेगाव येथील कार्यक्रम आटोपून नाशिकच्या चांदवड येथे पोहचली आहे. आज चांदवड येथे राहुल गांधी यांची मोठी सभा आणि रोड शो होणार आहे. या साठी इंडिया आघाडीचे नेते या ठिकाणी आले आहे. मात्र, आज या यात्रेत मोठा गोंधळ उडाला आहे. सभेपूर्वीच इडिया आघाडीतिल माकपचे बडे नेते आमदार जे. पी. गावित यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही धक्काबुक्की राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी केल्याचे समजते. या मुळे सभा स्थळी मोठा गोंधळ उडाला होता.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आली आहे. या निमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी या यात्रेच्या स्वगतासाठी जोरदार तयारी केली आहे. चांदवड येथे राहुल गांधी यांची सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे नेते हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या सभेला शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले आणि सर्वच इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील बडे नेते येणार आहे. माकप पक्ष सुद्धा इंडिया आघाडीतील एक मोठा घटक पक्ष आहे. दरम्यान, या यात्रेसाठी आमदार जे. पी. गावित हे देखील आले होते. मात्र, राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याने गोंधळ उडाला.
राहुल गांधी यांच्या सभेसाठी माकपचे नेते आमदार जे. पी. गावित यांचे नाव यादीत देण्यात आले होते. ठरल्या नुसार आणि ठरल्या वेळेत गावीत हे सभेला उपस्थित राहण्यासाठी सभास्थळी आले होते. दरम्यान, सुरक्षेचे कारण देत पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी गावीत यांना मध्येच थांबवले. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ उडाला. पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून गावीत यांना धक्काबुक्की झाल्याने सभास्थळी वाद देखील झाले. दरम्यान, या प्रकारानंतर बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते.