राज ठाकरेंना मोठा धक्का! मतदानाला चार दिवस बाकी असताना मनसेचा उमेदवारच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज ठाकरेंना मोठा धक्का! मतदानाला चार दिवस बाकी असताना मनसेचा उमेदवारच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

राज ठाकरेंना मोठा धक्का! मतदानाला चार दिवस बाकी असताना मनसेचा उमेदवारच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

Nov 16, 2024 05:41 PM IST

Akbar Sonawala joins shiv sena ubt : मोठ्या विश्वासानं विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.

राज ठाकरेंना मोठा धक्का! मतदानाला चार दिवस बाकी असताना मनसेचा उमेदवारच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत
राज ठाकरेंना मोठा धक्का! मतदानाला चार दिवस बाकी असताना मनसेचा उमेदवारच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

Akbar Sonawala : विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्यासाठी अवघे चार दिवस उरले असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. मनसेचे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अकबर सोनावाला यांंनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारा राज ठाकरे यांचा पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. मनसेनं नाशिकमधील नांदगावमधून अकबर सोनावाला या मुस्लिम कार्यकर्त्याला रिंगणात उतरवलं होतं. मात्र, मतदान काही दिवसांवर असताना त्यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सोनावाला यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.

नांदगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश धात्रक मैदानात आहेत. तर, शिंदे गटाचे सुहास कांदे निवडणूक लढवत आहेत. तर, छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष अर्ज भरून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केलं आहे.

नांदगावमध्ये उद्धव ठाकरे यांची नुकतीच जाहीर सभा झाली. या सभेत गणेश धात्रक यांनी मनसेचे उमेदवार अकबर सोनावाला यांच्या प्रवेशाची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळं आता इथं मनसेचा अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही. अशा परिस्थितीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार याविषयी उत्सुकता आहे.

मनसेचे माजी महापौरही ठाकरेंच्या शिवसेनेत

नाशिक महापालिकेचे माजी महापौर व मनसेचे नेते अशोक मुर्तडक यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुर्तडक हे नाशिकमधून आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी प्रसाद सानप यांना संधी देण्यात आली. त्यामुळं ते नाराज होते. मुर्तडक यांच्या रूपानं राज ठाकरे यांना पहिला धक्का बसला होता. त्यानंतर सोनावाला यांनी दुसरा धक्का दिला आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर