Sameer Bhujbal : महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, नांदगावमधून अपक्ष लढणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sameer Bhujbal : महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, नांदगावमधून अपक्ष लढणार

Sameer Bhujbal : महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, नांदगावमधून अपक्ष लढणार

Oct 24, 2024 06:40 PM IST

Maharashtra Assembly Elections : महायुतीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत.

महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, अपक्ष लढणार
महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, अपक्ष लढणार

Mahayuti : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडाला तोंड देणाऱ्या महायुतीला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देत त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी समीर भुजबळ यांनी पक्षाकडं केली होती. मात्र, ही जागा महायुतीतील जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेकडं गेली आहे. तिथं सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. कांदे आणि भुजबळ कुटुंबामध्ये तीव्र राजकीय मतभेद आहेत.

नांदगाव मतदारसंघात भुजबळ कुटुंबायांची मोठी ताकद आहे. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत इथून छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत सुहास कांदे यांंनी पंकज यांचा पराभव केला होता. तेव्हापासून त्यांच्यातील वैर विकोपाला गेलं आहे. त्यामुळंच यावेळी समीर भुजबळ यांनी नांदगावमधून कांदे यांना आव्हान देण्याची तयारी केली होती. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अखेर अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

भयमुक्त नांदगावसाठी…

पत्रकार परिषद घेऊन समीर भुजबळ यांनी भूमिका मांडली. नांदगाव विकासाच्या दृष्टीनं पुढं न्यायचं असेल आणि भयमुक्त करायचं असेल तर तुम्ही पुन्हा लढा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळं मी लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

राजीनामा पाठवून दिला आहे!

'अजित पवार, सुनील तटकरे यांनी मला मुंबईसारख्या शहराची जबाबदारी दिली होती. मी तिथं पूर्ण क्षमतेनं काम केलं. संघटना वाढवण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. मात्र, आता मला वेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. त्यामुळं महायुतीचा धर्म पाळताना पक्षाला अडचण येऊ नये म्हणून मी राजीनामा पक्षनेतृत्वाकडं पाठवून दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर