महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही तास आधी होणाऱ्या महायुतीच्या ७ उमेदवारांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यपाल कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ आमदारांपैकी ७ उमेदवारांची नावं महायुतीनं निश्चित केली आहेत. राज्यपालांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर आज तातडीनं या आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र, ही नियुक्ती बेकायेदशीर असून प्रकरण कोर्टात असताना शपथविधी होऊ नये असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.
राज्यपाल कोट्यातील १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं साडेतीन वर्षांपूर्वीच नावं पाठवली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नावांना मंजुरीच दिली नाही. त्यामुळं ती नियुक्ती रखडली होती. कालांतरानं राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं. ही नियुक्ती केली जाऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टानं जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला होता. मात्र, महायुतीनं ७ उमेदवार निश्चित करून त्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा न्यायालयात धाव घेतली. मात्र यावेळी ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे सरचिटणीस विक्रांत पाटील आणि बंजारा समाजाचे पुजारी धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांचा समावेश आहे. शिंदे सेनेचे मनीषा कायंदे आणि माजी खासदार हेमंत पाटील शपथ घेणार आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि सांगलीचे माजी महापौर इदरीस नायकवडी शपथ घेतील. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शपथ घेतील.