Shiv Sena UBT : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही खचून न जाता उद्धव ठाकरे हे निर्धारानं उभे ठाकले असून त्यांनी नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. तळागाळातील शिवसैनिकांचीही त्यांना साथ मिळताना दिसत आहे. त्यामुळंच अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आजही असाच एक प्रवेश सोहळा पार पडला.
भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी असंख्य शिवसैनिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
१९९२ साली मुंबईत दंगल झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी आम्हाला वाचवलं होतं. आज त्यांचं कुटुंब संकटात आहे. त्यांच्यासोबत उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. भविष्यात आम्ही अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेसोबत जोडू, असं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
प्रदीप उपाध्याय - भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव
घनश्याम दुबे - विश्व हिंदू परिषदेचे गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख व भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
रविचंद्र उपाध्याय - विश्व हिंदू परिषदेचे उत्तर मुंबईचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष
अक्षय कदम - उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय बजरंग दल
माधवी शुक्ला - भाजप जिल्हा महिला उपाध्यक्ष मिरा-भाईंदर (पूर्व)
राम उपाध्याय - भाजप जिल्हा महासचिव, मिरा-भाईंदर
संजय शुक्ला - राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ब्राम्हण परिषद
प्रदीप तिवारी - शिंदे गट, मीरा - भाईंदर जिल्हा महासचिव
दीपक दुबे - विश्व हिंदू परिषद, जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली
दिनेशकुमार यादव - विश्व हिंदू परिषद, तालुका प्रमुख (प्रखंड) बोरिवली
सूरज दुबे - बजरंग दल तालुका (प्रखंड) प्रमुख
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गटानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका जिंकायची असा भाजप व शिंदे गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेतील माजी नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न सातत्यानं भाजप व शिंदे गट करत आहे. उद्धव ठाकरे यांचे शिलेदारही आता तितक्याच आक्रमकपणे कामाला लागल्याचं दिसत आहे.