Torres Company Fraud : जादा परताव्याच्या आमिषाला अनेक जण बळी पडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असतानाच मिरा भाईंदरमध्ये एका खाजगी कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमीष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरा भाईंदरमध्ये रामदेव पार्क परिसरात टोरेस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीने नागरिकांना १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर हजारो गुंतवणूकदारांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांनी आक्रमक होत कंपनीसमोर ठिय्या दिला आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोस्त तैनात करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. टोरेस कंपनीने लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची ऑफर देत उच्च परताव्याचे आमिष दाखवले होते. गुंतवणुकीवर आठवड्याला ठराविक टक्केवारीने रक्कम खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले होते. यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते, त्या सर्वांची आता फसवणूक झाली असून मालक पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कंपनीकडून सुरुवातीला नियमितपणे हफ्ते दिले गेले, मात्र दर आठवड्याला हफ्ते जमा होत असताना देल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. टोरेस कंपनीच्या दादर येथील कार्यालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी झाल्याने मुंबई पोलीस देखील दाखल झाले आहेत. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त असून कोणालाही आत सोडले जात नाही.मुंबईसह नवी मुंबई, मिरा भाईंदर येथेही टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईच्या कार्यालयावर तर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला आहे.
गेल्या वर्षभरापासून ही कंपनी मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहे. ग्राहक जेवढी रक्कम गुंतवतील त्याच्या दहा टक्के रक्कम दर आठवड्याला मिळणार असल्याचं कंपनीने सांगितले होते. डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणूकदारांना व्याजाचे हप्ते मिळत होते.
पण गेल्या दोन आठवड्यांपासून हप्ते मिळत नसल्याने तसेच कंपनीकडून काहीच माहिती मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.आम्हाला तुमचं व्याज नको. पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. कंपनीमध्ये नागरिकांची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या