मला माफ करा, जाऊ द्या… पैसे वाटताना पकडल्यावर विनोद तावडे यांनी विनवणी केल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मला माफ करा, जाऊ द्या… पैसे वाटताना पकडल्यावर विनोद तावडे यांनी विनवणी केल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा

मला माफ करा, जाऊ द्या… पैसे वाटताना पकडल्यावर विनोद तावडे यांनी विनवणी केल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा

Nov 19, 2024 04:27 PM IST

Hitendra Thakur on Vinod Tawde : विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेल्यावर विनोद तावडे हे माफी मागत होते. सुटकेसाठी गयावया करत होते, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

पैसे वाटताना पकडल्यावर विनोद तावडेंनी २५ फोन केले, माफी मागितली! हितेंद्र ठाकूर यांचा दावा
पैसे वाटताना पकडल्यावर विनोद तावडेंनी २५ फोन केले, माफी मागितली! हितेंद्र ठाकूर यांचा दावा

Maharashtra assembly elections 2024 : विरार पूर्वेकडील हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे व भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना डायऱ्यांतील नोंदीसह पकडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपनं हा आरोप फेटाळला असला तरी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर प्रचंड आक्रमक झाले आहेत. पकडले गेल्यानंतर तावडे यांनी मला २५ वेळा फोन केले व माफी मागितली, असा दावा त्यांनी केला आहे.

बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी सगळ्या प्रकरणावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत. ह्यांना काही लाजशरम नाही. मतदानाच्या ४८ तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो हे त्यांना माहीत नाही का? ते राज्यात शिक्षणमंत्री होते ना, असा संताप ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

'भाजपचे लोक काहीही म्हणोत, आम्हाला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉपही आहे. पाच कोटींचं वाटप चालू आहे. कुठे-किती वाटप झालं त्याचीही माहिती आहे, असा दावाही ठाकूर यांनी केला.

तावडेंनी मला २५ फोन केले!

विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले. मला माफ कर, जाऊ द्या. प्लीज मला माफ कर. माझं चुकलं. हे प्रकरण जास्त ताणू नका, अशी विनवणी ते मला करत होते, असं हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 'माझं फोन बुक बघा. त्यात अनेक इनकमिंग कॉल आहेत. मला आधीच माहिती मिळाली होती की विनोद तावडे हे ५ कोटी रुपये घेऊन येणार आहेत. भाजपचा राष्ट्रीय नेताच पैसे वाटायला आलाय. आता निवडणूक आयोगानं व पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही सोडू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. राज्यात सत्ताधारी महायुती व विरोधकांच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर