Pune kondhwa Traffic change : पुण्यात कोंढवा येथे रस्त्याच्या कामामुळे येथील वाहतूक मोठा बदल करण्यात आला आहे. कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत शीतल चौक, अशोका म्युझ सोसायटी, पारगेनगर व कौसरबाग येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंढी होत असल्याने या ठिकाणची वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार ज्योती हॉटेल चौकातून फकरी हिल चौक मार्गे कमेला, साळुंके विहार येथे जाणारी सर्व प्रकारची जड वाहतूक व पाण्याचे टँकर उजवीकडे वळविण्यास बंदी करण्यात येत असून ती वाहने लुल्लानगर ब्रिजखालून यु-टर्न करून कमेला साळुंके विहाराकडे जातील. ज्योती हॉटेल चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शन मार्गे पारगेनगरकडे जाणारी जड वाहतूक व पाण्याचे टँकर ज्योती हॉटेलकडून डावीकडे वळण्यास बंदी करण्यात आली असून ती वाहने सरळ ज्योती हॉटेल आणि शितल चौक या पर्यायी मार्गाने पारगेनगर कडे जातील.
पारगेनगर येथून मेफेअर जंक्शनमार्गे ज्योती हॉटेलकडे जाणारी जड वाहतूक व पाण्याचे टँकर यांना बंदी करण्यात आली असून ती वाहने पारगेनगर-शितल चौक ज्योती हॉटेलकडे जातील. सर्वोदय जंक्शन चौक येथून कौसरबागेकडे जाणारी जड वाहतूक व पाण्याचे टँकरला बंदी करण्यात आली असून मेफेअर मार्गे ज्योती हॉटेलकडे पर्यायी मार्गाने जातील.
अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून कोंढवा वाहतुक विभागाअंतर्गत जारी केलेले वाहतूक बदलाचे तात्पुरते आदेश पुढील आदेश निर्गमित करण्यापर्यंत जारी राहतील, असेही वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.