Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभेची निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणिमाजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. यावेळी खतगावकर यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि मीनल पाटील खतगावकरही स्वगृही परतले आहेत.
मुंबईतील टिळक भवन येथे खतगावकरांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मंत्री अमित देशमुखही उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यामधील नायगाव विधानसभा मतदारसंघातून मीनल पाटील खतगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील त्यांच्यासोबत भाजपमध्ये आले होते. मात्र, आता भास्करराव खतगावकर पुन्हा स्वगृही परतल्याने हा अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांनी आज (शुक्रवार) टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाचा पराभव झाला होता. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर, त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले होते. तरीही नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला होता. आता हे तिघेही काँग्रेसमध्ये परतल्याने नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे.
खतगावकर काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील. अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.