कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

Dec 24, 2024 12:25 PM IST

ED Action on Dawood Ibrahim : ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच
कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

ED Action on Dawood Ibrahim : सक्त वसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने आज ठाण्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाचा फ्लॅट जप्त केला आहे.  ईडीने केलेल्या कारवाईमुळे  दाऊद इब्राहिमचा भाऊ अडचणीत आला आहे. दाऊदच्या भावाने बिल्डरला धमकावत बनावट नावाने फ्लॅट घेतला होता. हा फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.  

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कासकर यांचा ठाण्यातील फ्लॅट जप्त केला आहे.   कावेसर येथील निओपोलिस टॉवरमध्ये असलेला हा फ्लॅट मार्च २०२२ पासून तात्पुरत्या स्वरूपात  जप्त करण्यात आला होता. ईडीची ही कारवाई ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने २०१७ मध्ये दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. कासकर आणि मुमताज शेख आणि इसरार सईदसह त्याच्या साथीदारांनी दाऊद इब्राहिमशी जवळीक व दहशतीचा  फायदा घेऊन रिअल इस्टेट डेव्हलपरकडून मालमत्ता व  रोख रक्कम उकळली होती. ही बाब  ईडीच्या तपासात निष्पन्न झाली आहे. 

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शेख यांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची किंमत सुमारे ७५  लाख रुपये आहे. कासकर आणि त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहता आणि त्यांची कंपनी दर्शन एंटरप्रायजेस यांना टार्गेट  करून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. आरोपींनी १० लाख रुपयांच्या बनावट धनादेशाद्वारे फ्लॅट खरेदी केले होते आणि नंतर पैसे देखील उकळले होते.  

खरेदीचा रचला बनाव 

खंडणी लपवण्यासाठी तसेच फ्लॅट हा पैसे देऊन विकत घेतल्याचा बनाव रचण्यात आला होता.  खोटा आर्थिक व्यवहार करून हा फ्लॅट घेतल्याचे  ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. फेब्रुवारी २०२२  मध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी  मुंबई आणि देशाच्या विविध भागात दाऊद इब्राहिमच्या टोळीच्या कारवायांबद्दल चौकशी केली होती. त्यानंतर कासकर, शेख आणि सईद यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले.

ठाणे पोलिसांच्या अंतिम अहवालानंतर एप्रिल २०२२ मध्ये ईडीने मोक्का, खंडणी आणि कट रचणे यासह भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. २००३ मध्ये संयुक्त अरब अमिरातीतून हद्दपार करण्यात आलेला इक्बाल कासकर भारतात दाऊद इब्राहिमची टोळी चालवत असल्याचा संशय आहे. दाऊद पाकिस्तानातील कराची येथे लपून बसला आहे. दाऊदचा  पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झालं आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर