मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhushan Gagrani : मुंबई महापालिकेची सूत्रे भूषण गगराणी यांच्या हाती; आयुक्तपदी वर्णी

Bhushan Gagrani : मुंबई महापालिकेची सूत्रे भूषण गगराणी यांच्या हाती; आयुक्तपदी वर्णी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 20, 2024 03:54 PM IST

Bhushan Gagrani new BMC Chief : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईला महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती
मुंबईला महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती

Bhushan Gagrani News : निवडणूक आयोगानं इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी केल्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी (BMC Commissioner) ज्येष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गगराणी हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात होते. त्यानंतर नगर विकास खात्यात ते प्रधान सचिव पदी कार्यरत होते. जुलै २०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

गगराणी यांनी याआधी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. तसंच, माहिती व जनसंपर्क विभागाचे (DGIPR) महासंचालकपदही भूषवलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मार्च २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्समध्ये त्यांचा सहभाग होता.

गगराणी हे अनुभवी अधिकारी असून आव्हानात्मक कामं हाताळण्यात कुशल मानले जातात. नगर विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यात काम केलेल्या गगराणी यांना प्रशासकीय कामकाजाची उत्तम जाण आहे.

‘या’ नावांचीही होती चर्चा

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं आयुक्तपदासाठी तीन नावं पाठवली होती. त्यात भूषण गगराणी यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर (१९९१ बॅच) आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (१९९६) यांचा समावेश होता. त्यापैकी निवडणूक आयोगानं गगराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग