Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळं तर्कवितर्क लढवले जात असतानाच विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी थेट वडिलांच्या पक्षांतराची घोषणाच करून टाकली. त्यामुळं विलास लांडे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप गुलदस्त्यात असलं तरी काही जागांवर उमेदवार निश्चिती सुरू झाली आहे. त्यामुळं इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. लोकसभेला दणका बसलेल्या महायुतीनंही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, शरद पवारांनी नवनवे डाव टाकत भाजप व अजित पवारांच्या पक्षातील लोक गळाला लावणं सुरू केलं आहे.
माढ्यात बबन शिंदे व इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असतानाच आता विलास लांडे यांचंही पक्षांतर निश्चित झालं आहे. शरद पवार यांना सोडून भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांना लोकसभेला दारुण अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. शरद पवारांनी त्यांचे ८ खासदार निवडून आणले तर अजित पवारांना केवळ एक जागा जिंकता आली. सुनेत्रा पवार यांनाही बारामतीमधून पराभवाचा धक्का बसला. त्यातून सावरत असतानाच एकावर एक धक्के अजित पवारांना बसत आहेत.
विलास लांडे हे सध्या अजित पवार यांच्या पक्षात आहेत. ते भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या महेश लांडगे यांनी ७७,५६७ मतांनी त्यांचा पराभव केला होता. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. इथं शरद पवार यांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळं या पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लांडे हे पुन्हा एकदा भोसरीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, अजित पवार यांचा पक्ष सध्या भाजपच्या महायुतीत आहेत. भाजप ही जागा सोडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळंच विलास लांडे पर्याय शोधत असून स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं समजतं.