Bhor-Mahad road close : भोर वरंधा घाटातील भोर - महाड रस्ता दोन महिने दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक आजपासून बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरच्या भोर, पुणे डेपो व इतर डेपोंच्या दररोजच्या ११ फेऱ्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.
भोर तालुक्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी वरंधा (ता. महाड, जि. रायगड) रायगड जिल्हा हद्द हा वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी १ एप्रिल ते ३० में असा दोन महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वरंधा घाट पुढील दोन महिने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाने भोर-महाड रस्त्याने कोकणात जाणाऱ्या भोर डेपोची भोर-महाड बस, पुणे डेपोची पिंपरी चिंचवड ते खेड, पिंपरी चिंचवड ते अहिरेवाडी, पिंपरी चिंचवड ते माखजन, पिंपरी चिंचवड ते दापोली, पुणे ते महाड, जळगाव ते महाड, आंबेजोगाई ते खेड, पोलादपूर ते पुणे, महाड ते पुणे या सर्व ११ गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होणार आहेत.
दरम्यान, या एस.टी. बस बंद केल्यामुळे कोकणात जाणारे पर्यटक चाकरमानी, माल वाहतूक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी अडचण होणार आहे. सध्या पाडवा, लग्न समारंभ सिझन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. मात्र, एस.टी. बस सेवा बंद झाल्याने प्रवासी नागरिकांचे मोठे हाल होणार असून यावर पर्याय काढण्याची मागणी होत आहे.
राजेवाडी (ता. महाड) ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतिपथावर आहे. सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये (भोर हद्दीपर्यंत) संरक्षक भिंतीचे काम प्रगतिपथावर असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. परंतु पारमाची वाडी ते रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे आहे. परंतु, या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे.