Maharashtra Rains: भिवंडीत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, परिसरातील नाले तुंबल्याने रस्ते जलमय झाले आहेत. सखोल भागांत गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे.
भिवंडीत गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगर, कमला हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तीन बत्ती भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. घरी पोहोचण्यासाठी नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाचा जोर कायम राहिला तर नागरिकांचे घराबाहेर पडणे कठीण होऊ शकते. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. प्रेम पोळ (वय, १४) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम रविवारी सकळी मित्रांसोबत पोहोयला गेला. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
प्रेम पाण्यात बुडल्याची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. स्थानिक पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या