Bhiwandi Crime : राज्यात मुलींवरील अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही. बदलापूर येथे एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक शोषण करण्यात आले होते. तर अकोला येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने तब्बल ६ मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. या दोन्ही घटना ताज्या असतांना आता भिवंडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महापालिकेच्या एका शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना वह्या तपासण्याचा बहाण्याने बोलावून त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुइझम्मील हुसेन शबीर अहमद शेख (वय ३६) असे आरोपी शिक्षकांचे नाव आहे. त्याला शांतीनगर पोलिसानी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत सातवीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला आरोपीने वही तपासण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. यावेळी त्याने मुलीची वही तपासण्या ऐवजी तिला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवला.
हा प्रकार २६ ऑगस्ट रोजी दुपारी मधल्या सुट्टी दरम्यान घडला. मुलगी आरोपीने मुलीचे शोषण केल्यावर घाबरलेली ही मुलगी शाळेच्या शौचालयात जाऊन बसली. तब्बल दोन तास ही मुलगी वर्गात आली नसल्याने वर्गातील मॉनिटरने तिची बॅग शिक्षकांच्या कक्षात ठेवली. मुलगी परत आली तेव्हा ती तिची बॅग घेण्यासाठी शिक्षक कक्षात गेली होती. यावेळी तिला पालकांना घेऊन येण्यास वर्ग शिक्षिकेने सांगितले. मुलीने २८ तारखेला पालकांना शाळेत नेले. मात्र, तिने उशीर का झाला याचे कारण सांगितले नाही. पालकांनी मुलीला घरी नेऊन तिला विश्वासत घेतले. यावेळी तिने झालेला सर्व प्रकार सांगितला.
शिक्षक मुजम्मिल अन्सारी हा मुलींना नोटबुक चेक करण्याच्या बहाण्याने बोलावून अश्लील व्हिडीओ दाखवत असल्याचं तिने सांगितले. तसेच मुलींचा दुपट्टा खेचत असल्याचं देखील तिने घरच्यांना सांगितले. ही घटना जर कुणाला सांगितली तर मारण्याची धमकी तो देत होता. ही घटना समजल्यावर मुलीच्या पालकांनी थेट शांतीनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी देखील या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.