अयोध्येतील राम मंदिराचे सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटन करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सोहळ्यानिमित्त भिवंडी पालिकेने शहरात सोमवारी मांस-मच्छी विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी भिवंडी पालिकेच्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उदघाटन आणि राम मूर्ती प्राणपतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतली.
शांतता बैठकीला दोन्ही समाजातील विविध संघटना, पोलीस, शांतता समिती सदस्य, पालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस संकुलात ही बैठक पार पडली. यामध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दोन्ही समाजाला पोलिसांनी महत्वाच्या सूचना दिल्या. बैठकीनंतर पालिका प्रशासनाने एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. त्यात शहरातील मटण, चिकन आणि मच्छी विक्रीची दुकाने सोमवारी बंद ठेवण्याचे बैठकीत ठरल्याचा दावा पालिकेने केला आहे.
संबंधित बातम्या