भिवंडी : भिवंडीत येथे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक पोलिसाच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यात गाडी आदळल्याने गाडीवरील दोघे खाली पडले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनर एकच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर पोलिस कर्मचारी हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात टेमघर परिसरात घडला.
भाऊसाहेब कुंभारकर (वय ४०, रा. भादवड) याचा मृत्यू झाला. तर सुजय शिवाजी नाईक (वय ४२, रा. कल्याण) हे पोलिस हवालदार जखमी झाले आहे. भिवंडी-कल्याण मार्गावर रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघाले आहेत. यामुळे या मार्गावर आपघातांचे प्रमाण देखील वाढले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुजय शिवाजी नाईक हे भिवंडी कल्याण मार्गावरुन त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरुन जात होते.
यावेळी त्यांची दुचाकी पेव्हर ब्लॉक निघालेल्या खड्ड्यात आदळली. यामुळे गडीवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली पडले. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनर खाली त्यांचा मित्र आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार सुजय नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत भाऊसाहेब कुंभारकर यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनकरता शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.