ताम्हिणी नंतर आता भीमाशंकर अभयारण्यात पर्यटन करण्यास वनविभागाने घातली बंदी! धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ताम्हिणी नंतर आता भीमाशंकर अभयारण्यात पर्यटन करण्यास वनविभागाने घातली बंदी! धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद

ताम्हिणी नंतर आता भीमाशंकर अभयारण्यात पर्यटन करण्यास वनविभागाने घातली बंदी! धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद

Jul 01, 2024 02:32 PM IST

Bhimashankar Wildlife Sanctuary close for tourist : भिमाशंकर अभयारण्यात सुरू असलेल्या पावसामुळे देवस्थान दर्शन तसेच वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक भविकांसाठी भिमाशंकर वन्यजीव अभयारण्य बंद करण्यात आले आहे.

ताम्हिणी नंतर आता भीमाशंकर अभयारण्यात पर्यटन करण्यास वनविभागाने घातली बंदी! धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद
ताम्हिणी नंतर आता भीमाशंकर अभयारण्यात पर्यटन करण्यास वनविभागाने घातली बंदी! धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद

Bhimashankar Wildlife Sanctuary close for tourist : पुण्यात सध्या घाट विभागात पावसाचा जोर वाढला आहे. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पुण्यातील घाट विभागात फिरण्यासाठी जात असतात. पावसाळी पर्यटनासाठी भीमाशंकर अभयारण्यात व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठी असते. या अभयारण्यात अनेक धबधबे पाहण्यासाठी नागरिक जात असतात. मात्र, पावसाळ्यात हा परिसर धोकादायक होत असल्याने भीमाशंकर अभयारण्य ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती, उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी दिली आहे.

भीमाशंकर अभयारण्यात अनेक पावसाळी पर्यटन स्थळे असून येथे वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या अभयारण्यात रस्ते हे निसरडे झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ शकतो. या जीवघेण्या अपघातांची शक्यता लक्षात घेऊन वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ताम्हिनी घाटात जून महिन्यात मिल्की बार धबधब्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज आल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर २७ जून रोजी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता.

भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात देखील पावसामुळे निसरडया झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत या अभयारण्यातील निसर्गवाटा १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटनासाठी बंद केल्या आहेत.

भिमाशंकर परिसरात भिमाशंकर देवस्थान दर्शन घेण्यासाठी तसेच वर्षा ऋतुतील आल्हाददायक परिसर व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठया प्रमाणावर करत आहेत. तथापि वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य - १ तसेच वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य-२ मधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून वनपरिक्षेत्र अधिकारी, भिमाशंकर वन्यजीव अभयारण्य- १ व २ यांच्या वतीने या धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

हे मार्ग बंद

भीमाशंकर अभयारण्यात कोंढवळ धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. या धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. तसेच चोंडीचा धबधबा, न्हाणीचा धबधबा, सुभेदार धबधबा, घांगळ घाट नाला खांडस ते भिमाशंकर मार्ग, शिडी घाट- पदरवाडी ते काठेवाडी मारत पुर्णतः बंद करण्यात आले आहे.

नियमांचे पालन करा! अन्यथा कारवाई

उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांचे वतीने भिमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटना वेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच परवानगीशिवाय अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये असे अवाहन करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायदया अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर