Bhendval Ghat Mandni : बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत आज करण्यात आळे. या भाकितात पुढील वर्षी वातावरण कसे राहील, पीक पाणी कसे राहील, पाऊस कसा राहील या बद्दल भाकीत वर्तवण्यात आले. यावर्षी पावासाची पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. तर पावसाचे प्रमाण देखील सर्वसाधारण राहणार आहे. या वर्षी अवकाळी पाऊस सर्वाधिक होईल. या सोबतच पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील त्यानंतरच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकीत भेंडवळमध्ये वर्तवण्यात आले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यात भेंडवळची भाकीत वर्तवण्यात येते. या भाकीताच्या आधारे विदर्भातील शेतकरी पिकांचे नियोजन देखील करत असतात. हे भाकीत ऐकण्यासाठी दूरवरून शेतकरी येत असतात. यावर्षी पिकांची परिस्थिती साधारण सांगण्यात आली आहे.
या घट मांडणीत गावाच्या पूर्वेस एका शेतात अठरा प्रकारची धान्ये एका गोलाकार आकारात ठराविक अंतरावर ठेवली जातात. तसेच मध्यभागी खड्डा तयार करून त्यात चार मातीचे गोळे ठेऊन त्यावर एक पाण्याची घागर ठेवली जाते. तसेच त्यावर पुरी, करंजी, पान सुपारी ठेवण्यात येते. प्रत्येक वस्तू एका प्रतिकाप्रमाणे वापरली जाते. अक्षय तृतीयेची रात्र या घटमांडणीवरून गेल्या नंतर या घटात झालेल्या बदलांच्या आधारे देशातील पीक-पाणी राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तसेच विविध अंदाज वर्तविला जातात. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस या घटमांडणीत झालेल्या बदलाच्या आधारे भाकीत वर्तवण्यात आले. या वर्षी पावसाची परिस्थिती सर्वसाधारण राहील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
या वर्षी भेंडवळच्या भाकितात परकीय आक्रमनाचा धोका नसेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. आज सूर्योदयावेळी या मंडणीचे निरीक्षण गावातील ग्रामस्थांनी करून विविध अंदाज मांडले. या वर्षी जून, जुलै हे महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. मात्र, त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी या घटमांडणीतून जे भाकित करण्यात आले होते ते ९० टक्के खरे झाले आहे.
घटमांडणीतील भाकितानुसार यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. खरिप हंगामात पिकं साधारण राहणार आहे. रब्बी हंगामात गव्हाचे पिक चांगले येणार आहे. तर रोगराईचा परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.