Bhayandar To Vasai Ferry Service Ticket: वसई-भाईंदरदरम्यान बहुप्रतिक्षित रोल-ऑन आणि रोल-ऑफ रोरो फेरी सेवा मंगळवारपासून (२० फेब्रुवारी २०२४) सुरू होईल. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी शनिवारी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. ही सेवा सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील अंतर ३४.७ किमीने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या तब्बल ५५ मिनिटांची बचत होईल. ही सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असेल.
वसई-विरार येथून मुंबई आणि मीरा- भाईंदरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये 'सागरमाला योजने'अंतर्गत भाईंदर पश्चिम ते वसई किल्लाबंदर अशी रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहा कोटींहून अधिक निधीही मंजूर करण्यात आला.
वसई जेटी येथून शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी पहिली बोट सोडण्यात येणार आहे. भाईंदर आणि घोडबंदर जेटींचेही उद्घाटन होणार आहे. मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जान्हवी नावाच्या कंत्राटदाराच्या बोटीमध्ये एकाच वेळी ४० वाहने आणि १०० लोक एकाच वेळी प्रवास करू शकतात. सध्या १३ फेऱ्यांसाठी वेळ निश्चित करण्यात आली. लोकांचा प्रतिसाद पाहून वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.