विधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस, खताळ यांचे आव्हान कसं पेलणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस, खताळ यांचे आव्हान कसं पेलणार?

विधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस, खताळ यांचे आव्हान कसं पेलणार?

HT Marathi Desk HT Marathi
Published Mar 12, 2025 03:36 PM IST

आगामी कारखाना निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एकत्रीतपणे पॅनल उभे करण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र,बाळासाहेब थोरात यांच्या तुलनेत अमोल खताळ हे सक्रीय दिसत नाहीत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणूक
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणूक

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणानंतर थोरात यांना यंदाची कारखान्याची निवडणूक जड जडाण्याचे संकेत दिसत आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचीत आमदार अमोल खताळ यांना विखे गटाची साथ मिळत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ या संस्थेने कारखाना क्षेत्रात ग्राउंडवर जाऊन आढावा घेतला आहे.

महाराष्ट्रातील विविध सहकारी साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची देखील लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. साधारणत: एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक संपन्न होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भाऊसाहेब थोरात कारखान्याचे कार्यक्षेत्र क्षेत्र मुख्यतः संगमनेर, अकोले आणि काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात आहे. यामध्ये २४५ गावांचा समावेश होतो.  तर कारखान्याचे २१ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. पाच गटांमध्ये कारखान्याचे सभासद आहेत. या कारखान्याची साडेसात हजार मेट्रीक टन ऊस गाळप क्षमता असून अहिल्यानगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. अहिल्यानगर जिल्हात खासगी आणि सहकारी असे एकूण २१ कारखाने आहेत. सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन व सर्वाधिक साखर निर्यात यामध्ये कारखान्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कारखान्यामध्ये मळीपासून अल्कोहल निर्मिती करून इथेनॉल निर्मिती केली जाते. तसेच ३० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याची सद्यस्थिती -

आगामी कारखाना निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एकत्रीतपणे पॅनल उभे करण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या तुलनेत अमोल खताळ हे सक्रीय दिसत नाहीत. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या संचालक मंडळाला दिलेल्या सूचनेनुसार संचालकांनी सभासदांमध्ये जनसंपर्क वाढविल्याचे दिसून येते. तसेच कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत: बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घातले असून ते देखील सभासदांच्या संपर्कात आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल सभासद वर्गामध्ये सहानुभूती दिसून येत आहे. तसेच कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामधील विविध सामाजिक कामांसाठी कारखान्यातील गाड्या, अर्थमुव्हर्स मशीन, अग्नीशमन दलाची वाहने तसेच मैदान मोफत उपलब्ध करून दिले जाते.  त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात मदत केली जाते.

कारखान्याच्या प्रत्येक गटातील प्रत्येक कार्यकर्त्यांना श्री. बाळासाहेब थोरात यांनी कारखान्यावर संचालक अथवा तज्ञ संचालक म्हणून वेळोवेळी संधी दिलेली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्याबाजूने वातावरण असल्याचे चित्र आहे.

कारखान्याच्या निवडणुकीचा अंदाज घेऊन बाळासाहेब थोरात यांनी तळेगाव आणि जोरवे गटातील नाराज कार्यकर्ते आणि सभासदांशी संपर्क करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून सभासदांसह इतर रुग्णांना सवलतीच्या दरात व मोफत उपचार पुरवतात. 

कारखान्याचे नाव ‘संगमनेर सहकारी साखर कारखाना’ असे होते. ते नाव बदलून ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना’ असे करण्यात आले. त्यामुळे काही सभासदांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल नाराजी असल्याचे दिसून येते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना, राजहंस दूध सहकारी संस्था, संगमनेर दूध सहकारी संस्था, अमृतवाहीनी शिक्षण संस्था या संस्थांच्या संचालक मंडळांवर सामान्य कार्यकर्त्यांना घेतले जात नाही, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा दिसून येते. प्रवरेच्या पूर्वकडील जोरवे गटामध्ये विखे पाटील यांना मानणारा सभासद वर्ग आहे. त्यामुळे विशेषत: जोरवे गटातून थोरात यांना आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणुकीत तळेगाव आणि साकूर भागातून बाळासाहेब थोरात यांना कमी मतदान मिळाले होते. या भागात देखील विखे पाटील घराण्याचा अधिक प्रभाव दिसून येतो. या भागातून कारखाना निवडणुकीत देखील विधानसभा निवडणुकीसारखी पुनरावृत्ती होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर