Bhaskar Jadhav Crying : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे चिपुळून येथे आज त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. या साठी त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. यामुळे त्यांची पक्षात घुसमट होत असून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. दरम्यान या मेळाव्या संदर्भात त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी त्यांच्या नाराजीबद्दल मोठा खुलासा केला असून मुलाचे बोलणे ऐकतांना भास्कर जाधव यांना रडू कोसळले. भर मंचावर असतांना त्यांना अश्रु अनावर झाले होते.
भास्कर जाधव यांची पक्षात घुसमट होत असून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याच चर्चेत जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र व्हायरल झाल्याने ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या बाबत घटणाऱ्या गोष्टीबाबते ते आज कार्यकर्त्यांपुढे आपली भूमिका मांडणार आहेत.
दरम्यान, या मेळाव्यात आज भास्कर जाधव यांचे पुत्र, विक्रांत जाधव हे बोलत असतांना त्यांनी त्यांच्या वडिलांची बाजू मांडली. विक्रांत जाधव म्हणाले, भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत. ते कधी दगा करणार नाहीत. कारण पाठ दाखवून पळणे आमच्या रक्तात नाही. विक्रांत जाधव यांचे हे शब्द ऐकताच भास्कर जाधवांना मंचावर अश्रू अनावर झाले. विक्रांत जाधव म्हणाले, भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात सुरू असणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. आजकाल पैसे देऊन सभेला कसे लोक आणले जाता हे तुम्ही सर्व जण पाहत आहात.
मला आयुष्यात जर काही कमवायचे असेल तर माझ्या वडिलांनी जसे ४० वर्ष तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमवले ते मला कमवायचे आहे. मला दुसरं काहीही नको. प्रामाणिक लोकं पैसे देऊन आणली जात नाहीत. त्यासाठी प्रेम आणि आदर जपावा लागतो. हे प्रेम भास्कर जाधव यांनी ४० वर्षांपासून जपले आहेत. तुमचे हे प्रेम त्यांची लढण्याची ताकत आहे.
विक्रांत जाधव म्हणाले, ‘मी प्रसार माध्यमांना विनंती करतो की, कुठल्यातरी पत्राचा आधार घेऊन निराधार बातम्या देऊ नका. चुकीच्या बातम्या येतात तेव्हा आम्हालाही त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो. आम्ही कुठेही जाणार नाहीत. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात ज्या बातम्या सुरू आहेत, त्या सर्व निराधार आहेत. केवळ पत्राचा आधार घेऊ चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत.