सरकारी रुग्णालयातील अस्वच्छा, ऑक्सिजनची कमतरता तसेच अनागोंदी कारभाराच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यातच आता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेचा तसेच नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडल्यानंतर खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत गोंधळ घातला. नातेवाईकांनी स्मशानभूमीतच ठिय्या दिला.
अश्विनी मेश्राम असं मृत महिलेचं नावं असून ती भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील लोहारा खराशी गावातील रहिवासी होती. अश्विनीला तिच्या कुटुंबियांनी शनिवारी भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलं होतं. मात्र प्रसूती दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला.
रुग्णालयात अधिक गोंधळ न घालता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. डॉक्टरांनी सांगितले होते की, महिलेला मुलगा झाला होता, मात्र तो मृत जन्माला आला होता. रविवारी सकाळी महिलेवर अंत्यसंस्कार करण्याकरिता कुटुंबीय व नातेवाईक गावातील स्मशानभूमीत गेले होते. यावेळी महिलेला दफन करण्याच्या विधीसाठी शवविच्छेदन केलेल्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी उघडला. मात्र, त्यात कुटुंबियांना बाळ दिसलेच नाही. त्यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयाने मुलगा झाल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी स्मशानभूमीतचं संताप व्यक्त केला. मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत कुटुंबीयांनी स्मशानभूमीतचं ठिय्या आंदोलन सुरू केलं.
महिलेच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात खळबळ माजली असताना यावर जिल्हा रुग्णालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नातेवाईकांनी महिलेला वेळेत प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं नाही. जेव्हा रुग्णालयात आणले गेले तेव्हा तिची प्रकृती नाजूक होती. त्यातच महिलेला अतिरक्तदाबाचा त्रास असल्याने महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून महिलेचा गाव लोहारा खारशी येथे जाऊन समिती माहिती गोळा करणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.