मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपाल RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते अन् भाजपचे एजंट, राष्ट्रवादीचा घणाघात

राज्यपाल RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते अन् भाजपचे एजंट, राष्ट्रवादीचा घणाघात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 06, 2022 10:29 PM IST

राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काळी टोपी घालून पूर्णवेळ संघाचं कार्य केलं,अशी बोचरी टीका मिटकरी यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांना नुकचीत राज्याची माफी मागावी लागली होती. यानंतर विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडलं. तर भाजपानंदेखील त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. या वक्तव्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे भारतीय जनता पार्टीचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काळी टोपी घालून पूर्णवेळ संघाचं कार्य केलं, अशी बोचरी टीका मिटकरी यांनी केली आहे. मोदींमुळे भारतीयांना परदेशात मान मिळाला, या राज्यपालांच्या वक्तव्याचाही अमोल मिटकरींनी चांगलाच समाचार घेतला आहे.

राज्यपाल हे भाजपाचे एजंट असून त्यांना लवकरात लवकर त्यांना राज्यातून परत पाठवा, असा टोलाही मिटकरी यांनी राज्यपालांना लगावला आहे. मिटकरी म्हणाले की, सध्याचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त विधानं करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, ते राजकीय पद नाही. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राष्ट्राने आतापर्यंत २१ राज्यपालांचा कार्यकाळ पाहिला आहे. पण भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांनी भाजपाचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलं असल्याची टीकाही मिटकरी यांनी केली आहे. 

WhatsApp channel