मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार! २६ जानेवारीच्या आधी की नंतर?

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार! २६ जानेवारीच्या आधी की नंतर?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2023 04:17 PM IST

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारी नंतर किंवा त्यापूर्वी त्यांना हटवले जाऊ शकते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई -  आपल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून देणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद असे समीकरणच गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्याची वारंवार मागणी केली होती. राज्यपालांच्या वक्तव्याने भाजपही अनेकवेळा अडचणीत आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत किंवा प्रजासत्ताक दिनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर ते राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणे केले असून याबाबत दिल्लीतील हायकमांड याचा निर्णय घेणार आहेत. सध्या महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांचा नवा वाद नसल्याने हीच योग्य वेळ साधत येत्या आठवड्याभरात राज्यपाल कोश्यारींना केंद्रीय गृह मंत्रालय त्यांना परत बोलावू शकते. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित  काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे. 

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि  आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

IPL_Entry_Point