मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोश्यारींनी महाराष्ट्राशी नमकहरामी केलीय; उद्धव ठाकरेंचा थेट वार

कोश्यारींनी महाराष्ट्राशी नमकहरामी केलीय; उद्धव ठाकरेंचा थेट वार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 30, 2022 02:19 PM IST

Uddhav Thackeray attacks Bhagat Singh Koshyari: मुंबई व महाराष्ट्राविषयी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

Uddhav Thackeray - Bhagat Singh Koshyari
Uddhav Thackeray - Bhagat Singh Koshyari

Uddhav Thackeray attacks Bhagat Singh Koshyari: 'भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहेच, पण ज्या महाराष्ट्राचं मीठ गेले तीन वर्षे ते खात आहेत, त्या मिठाशी सुद्धा कोश्यारी यांनी नमकहरामी केली आहे,’ असा थेट हल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांवर चढवला.

'मातोश्री' निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'राज्यपाल कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य हे अनावधानानं आलेलं नाही. त्यांची भाषणं मुंबईत लिहिली जातात की दिल्लीतून येतात हा प्रश्न आहे. कारण, अनेक मुद्द्यावर ते अजगरासारखे सुस्त पडून राहतात आणि काही मुद्द्यावर अनावश्यक तत्परता दाखवतात. विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी अशीच सुस्त भूमिका घेतली होती, याकडं उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं. 

'कोश्यारी यांनी कहर केला आहे. त्यांनी मराठी माणसांचा अपमान केला आहेच, पण हिंदू समाजातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुका येत आहेत. अशा वेळी राज्यातील विविध जातीय व धर्मीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज्यपाल पदावर असताना ते हे करत आहेत. त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम कोश्यारींनी केलं आहे. शिवाय, महाराष्ट्राच्या मिठाशी त्यांनी नमकहरामी केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘आपल्याकडं काही नवहिंदूवादी तयार झाले आहेत. त्यांना हिंदुत्वाचे मोड आलेले आहेत. त्या मोडधारी आणि सत्ताधारी हिंदूंनी या राज्यपालांबद्दल भूमिका घ्यायला हवी. हे पार्सल जिथून कुठून पाठवण्यात आलं आहे, ते पार्सल पदाचा मान राखत नसेल. विविध जाती-धर्मांमध्ये भांडणं लावत असेल त्याच्या बाबतीत सरकारनं निर्णय घ्यायला हवा,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘त्यांच्या खुलाशानं आमचं समाधान होणारच नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. सीएए, एनआरसीच्या वेळी सुद्धा महाराष्ट्रात दंगली झाल्या नव्हत्या. तुम्ही कशाला आगी लावता? हे राज्यपाल पदावरील व्यक्तीला अजिबात शोभत नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

IPL_Entry_Point