BEST Conductor Fake Ticket News: प्रवाशांचे पैसे लाटण्यासाठी बेस्टच्या एका कंडक्टरने लढवलेली शक्कल पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या कंडक्टरने प्रवाशांना तिकीटाऐवजी झेरॉक्ट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित बस कंडक्टरविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. विभागीय चौकशीत कंडक्टर दोषी आढळल्याने त्याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र खुंटे असे निलंबन झालेल्या बस कंडक्टरचे नाव आहे. खुंटे हे मुंबईतील देवनार आगारात कार्यरत होते. तर, अशोक चौरे (वय, ५६) असे तक्रारदार बस निरीक्षकाचे नाव आहे. अशोक हे २० एप्रिल २०२३ रोजी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास वाशी बिटअंतर्गत देवनार आगार मुंबई ते कळंबोली प्रवास करणाऱ्या बसमधील प्रवशांचे तिकीट तपाणीच्या कामासाठी हजर होते. त्यावेळी खुंटे कंडक्टर असलेल्या बसमधील प्रवासी वाशी हायवे बस थांब्यावर उतरले. अशोक यांनी प्रवाशांची तिकीट तपासले असता खुंटे यांनी प्रवाशाला तिकीटाऐवजी झेरॉक्स दिल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर बस निरीक्षकाने खुंटेची तक्रार केली. याप्रकरणी आठ महिन्यांनी चौकशींती ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात खुंटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. खुटेंनी बेस्ट प्रशासनाची फसवणूक केल्याची त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या