Lalbaug Bus Accident : चेंबुर येथे कार अपघातात तिघे जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना, लालबाग येथे एक भीषण अपघात झाला आहे. काही प्रवाशांना घेऊन जाणारी बेस्टबसमध्ये एका दारुड्याने चालकाशी हुज्जत घालत त्याच्या हातातून बसचे स्टेरिंग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. या अनियंत्रित बसने चार ते पाच वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. पोलिसांनी दारुड्याला अटक केली आहे. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दत्ता शिंदे असं दारुड्या व्यक्तीचं नाव आहे.
रविवारी रात्री बेस्टची ६६ क्रमांकाची बस ही नेहमी प्रमाणे बॅलार्ड पियरच्या दिशेनं राणी लक्ष्मीबाई चौक सायन इथे जात होती. या बसमध्ये काही प्रवासी देखील होते. या बसमधून एक दारूच्या नशेत असलेला मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. या प्रवाशाने बस चालकाच्या शेजारी जात विनाकारण हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी बस ही लालबाग येथील गणेश टॉकीज परिसरात आली होती. यावेळी अचानक मद्यधुंद व्यक्तीने अचानक बसच स्टेअरिंग पकडलं. अचानक झालेल्या या घटनेमुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं.
यावेळी ही बस दोन दुचाकी व एक कार आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेत नऊजण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती ही गंभीर आहे. जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दारुड्या प्रवाशाला अटक केली आहे. वाहक आणि चालक यांना देखील काळाचौकी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
या घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. यामुळे गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी येत अपघातग्रस्त वाहने ही बाजूला केली. तसेच आरोपीला अटक केली. यानंतर वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली. बसमघ्ये घडलेल्या या प्रकारामुळं प्रवाशांनाही धडकी भरली. काही काळ बस रस्त्यावरून वेडीवाकडी चालल्यानं काही प्रवाशांनाही इजा झाली.