भोंगळ कारभार..! ‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला, अर्ज न करताच खात्यात आले ३ हजार-benefit of ladaki bahin yojana to man money deposited in his account in yavatmal ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भोंगळ कारभार..! ‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला, अर्ज न करताच खात्यात आले ३ हजार

भोंगळ कारभार..! ‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला, अर्ज न करताच खात्यात आले ३ हजार

Aug 16, 2024 11:43 PM IST

ladakibahinyojana : महिलांसाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. कोणताही अर्ज न करता तसेच कोणतीही कागदपत्रे दिली नसताना त्याच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत.

‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला
‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. या योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांचे ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या स्वालंबनासाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ चक्क एका पुरुषाला मिळाला असून त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता,ना कोणती कागदपत्र दिली होती, तरीही त्याच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. या प्रकरणमुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला आहे.

हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे घडला आहे. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे.

जाफर शेख सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नसताना त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात योजनेचे३हजार रुपये जमा झाले. खात्यात जमा झालेली रक्कम पाहून तो चक्रावून गेला. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी दिवसभर रांगेत थांबून अर्ज भरला, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ केली. मात्र बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अनेक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे कोणताही अर्ज न करता एका पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर जाफर शेख म्हणाला की, सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होत आहेत. तसाच एक मेसेज माझ्या मोबाईलवर आला व माझ्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात ३ हजार जमा झाल्याचं समजलं. हे खातं मी २०१२ मध्ये उघडलं होतं.

 

मात्र बँक गावापासून दूर असल्याने व्यवहार करत नाही. मोबाईलवर मेसेज पाहून तो यवतमाळला गेला व बँकेचे स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर समजलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे३हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र यासाठी मी कोणताही अर्ज केलेला नाही. कुठेही कागदपत्रे दिली नाही. तरीही हे पैसे कसे जमा झाले याची चौकशी व्हावी.