supreme court to Ajit pawar Group : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडली. राष्ट्रवादी कॉँग्रेस विभागली जाऊन अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घडयाळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले तर शरद पवार गटाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसहे नाव देत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केले. या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गट हा शरद पवार यांचे नाव नाव आणि फोटो वापरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून कोर्टाने अजित पवार यांना खडसावले असून शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करत फटकारले आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पाडली. कोर्टात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करत शरद पवार यांची बाजू मांडली. मोठा युक्तिवाद करत अजित पवार गट शरद पवार यांचे नाव तसेच फोटो वापरत असल्याचा आरोप सिंघवी यांनी करत यावर आक्षेप नोंदवला. याचा पुरावा अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात दिला.
सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाचे हे पोस्टर्सवर न्यायालयाने पहावे. त्यावर शरद पवारांचे फोटो आणि नाव आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह दिल्यावर अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह कसे वापरू शकतात असा सवाल करत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टापुढे केली.
सुप्रीम कोर्टाने याची दाखल घेतली असून अजित पावर गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरता येणार नाही असे म्हणत ते न वापरण्या संदर्भात असं लेखी देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या बाबत तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना देणीयचे देखील कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १८ मार्च रोजी घेतली जाणार आहे.