Beed: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार; बीडमधील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार; बीडमधील धक्कादायक घटना

Beed: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार; बीडमधील धक्कादायक घटना

Dec 26, 2024 05:37 PM IST

Beed Crime: बीडमधील अंबाजोगाई येथे दारु प्यायला नकार दिला म्हणून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

बीड: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार
बीड: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार

Beed News: बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या घटनेला महिना उलटला नाही, तोच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील स्वाराती रुग्णालयाजवळील पोलीस चौकीसमोरच एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या तरुणाने दारु प्यायला नकार दिल्यानंतर पेटलेल्या भांडणातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेतील मुख्य आरोपी श्रीहरी मुंडेने जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह केला. परंतु, जमीरने त्याला नकार दिला. मात्र, तरीही श्रीहरी जमीरला दारू पिण्यासाठी जबरदस्ती करू लागला. यामुळे संतापलेल्या जमीरने श्रीहरीला शिवीगाळ केली. त्यानंतर गुरुवारी मध्य रात्री १२.३० वाजताच्या सुमारास जमीर स्वाराती रूग्णालयासमोरील चौकात बसलेला असताना श्रीहरीने त्याला पोलीस चौकीजवळील एटीएमसमोर बोलावले.

मुख्य आरोपीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जमीर तिथे पोहोचताच शिवीगाळ का केली? असा जाब विचारून त्याच्या मानेवर कोयत्याने वार केला. त्यावेळी आरोपीसोबत असलेल्या इतर तिघांनी देखील जमीरवर कोयता आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत जमीर गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या हल्ल्यात जमीर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जमीरच्या भावाने दिलेल्या अंबाजोगाई शहर ठाण्यात मुख्य आरोपी श्रीहरी आणि आर्यन मांदळे यांच्यासह इतर दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 

बीडमध्ये गुन्हेगारी वाढली, महिलाही सुरक्षित नाहीत!

बीड जिल्ह्यात गेल्या दिवसांत गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३६ जणांची हत्या झाली आहे. तसेच गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे ४९८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हेतर बीडमध्ये महिला देखील सुरक्षित नाहीत. जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात विनयभंगाच्या १५६ आणि छेडछाडीच्या ३८६ घटना घडल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर