मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed: सुषमा अंधारेंसमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखांची गाडी फोडली

Beed: सुषमा अंधारेंसमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखांची गाडी फोडली

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 19, 2023 08:19 AM IST

Sushma Andhare: शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare (HT)

Beed News: बीडमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना घडली. उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद आणखी पेटला. मात्र, सुषभा अंधारे यांनी मध्यस्ती करत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवला. यादरम्यान, वरेकर यांनी जाधव यांची गाडी फोडली, असा आरोप केला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असताना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. यावेळी वरेकर यांनी जाधवांची गाडी फोडली. यामुळे काही काळ कार्यक्रम स्थळी तणाव निर्माण झाला होता. मात्र, सुषमा अंधारे यांनी मध्यस्ती करून दोन्ही नेत्यांना शांत केले. दरम्यान गैरसमजातून वाद झाला असून हा वाद आता मिटलेला आहे, असं जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितलं आहे.

सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वीच सभेची माहितीही दिली. आत्तापर्यंत महाप्रबोधन यात्रेच्या अनेक सभा झाल्या आहेत. आता पहिल्यांदाच बीडमध्ये मी आणि संजय राऊत आम्ही दोघेही सभा घेत आहोत.

WhatsApp channel