Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराडची अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचे उघड झाले. वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. बीड, परळी, पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर सोलापुरातही वाल्मिक कराडची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव कोट्यावधी संपत्तीची मालक असून तिच्या नावे बार्शीत जवळपास ३५ एकर शेती आहे. परंतु, या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या अनेक कुटुंबाला गेल्या तीन- चार महिन्यापासून पगार दिला जात नाही, अशी माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे बार्शीतल्या शेतात काम करणाऱ्या माणिक शिंदे- माने यांच्या कुटुंबाला मागील तीन चार महिन्यापासून पगार देखील मिळाला नाही. सालगड्याने दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड कोण आहे? याबाबत त्याला काहीही माहिती नाही. परंतु, ज्योती मंगल जाधवकडून त्यांना गेल्या तीन चार महिन्यापासून पगार मिळाला नाही. ज्योतीचा भाऊ जाधव मास्तरने सात महिन्यापूर्वी माणिक शिंदे- माने यांच्या कुटुंबाला सालगडी म्हणून कामाला ठेवले होते. सुरुवातीचे दोन महिने त्यांना वेळेत पगार मिळाला. पण गेल्या तीन- चार महिन्यापासून ज्योती किंवा तिचा भाऊ शेतीकडे फिरकले नाहीत. या शेतात मोसंबी, लिंबू, नारळ, हरबरा इत्यादी पिकांची लागवड करण्यात आली.
वाल्मिक कराडबाबत एकमागून एक धक्कादायक खुलासे करणाऱ्या समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने ४ जमीनीचे सातबारे असल्याचे ट्विट केले होते. दमानिया यांनी म्हटले की, 'वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवले. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे ४ सातबारे आहेत. ह्या ज्योती मंगल जाधव कोण आहेत, ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे. खूपच मोठी जमीन आहे. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी व कसे दिले ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे?' अशी मागणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
संबंधित बातम्या